बाजारीकरण म्हणजेच आजच्या काळातल्या परिभाषेत बोलायचं झालं तर Marketization. ह्या शब्दाची व्याख्या आपण अत्यंत मर्यादित केली आहे. बाजारीकरण म्हटलं की आपण लगेच तर्क लावतो की गोष्ट नक्कीच कुठल्यातरी उद्योगाशी निगडित असणार. पण बाजारीकरण फक्त औद्योगिक क्षेत्रातच होतं का? तर नक्कीच नाही. तसा विचार केला तर आज बाजारीकरण आपल्या रक्तातच भिनलंय. पैसा, शिक्षण, राजकारण एवढंच काय तर संबंधांमध्येही बाजारीकरण दिसून येतं.
आजच्या शिक्षणपद्धतीबाबतची ओरड आपल्याला काही नवीन नाही. शिक्षणपद्धतीत असलेल्या त्रुटींमुळे आपल्याला वाटतं की शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. अर्थात ते खरंच आहे ह्यात काही वाद नाही, पण ती पातळी आणखी खाली नेण्यास फक्त शासन नसून कदाचित आपण सगळेच तर जबाबदार नाही ना? ह्याच शिक्षणाला आपण थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर?
आपला पाल्य फक्त इंग्रजी माध्यमातून शिकला पाहिजे असा अट्टाहास आजकालच्या पालकांमध्ये दिसून येतो आणि त्यासाठी त्यांची इतकी धडपड चालते की काही विचारायला सोय नाही. एकीकडे अगदी बालवाडीसाठी प्रवेश मिळावा म्हणून लोक रात्रभर इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाहेर रांगा लावून उभे असतात आणि दुसरीकडे मराठी शाळांचे प्रवेश पूर्ण देखील होत नाहीत. एकीकडे वर्गावर्गात कोंबून कोंबून विद्यार्थी भरून ह्या शाळा मोठ्या होतात आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांअभावी मराठी शाळा ओस पडत जातात. आणि एवढा आटापिटा करूनही कित्येक गोळ्यांना इंग्रजीचा 'इ' सुद्धा येत नाही. आज इंग्रजी शाळेत शिकणं हा गरजेचा विषय राहिला नसून प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. इंग्रजी शाळांना जगात चांगल्या पद्धतीने 'बाजार' मांडता आला (फक्त शाळाच नाही हं!) आणि मराठी शाळांना नाही, म्हणून ही गत. आजही आपल्या आजुबाजुचे अनेक लोक इंग्रजी शाळा कशा चांगल्या आणि 'मी माझ्या मुलाला इंग्रजी शाळेतच घालणार' अशी गर्जनाच करतात तेव्हा खरंच त्यांची खूप कीव येते.
मध्यंतरी नोटाबंदीचा विषय खूप चर्चेत होता. काही लोकांना भल्यामोठ्या चिंतेने ग्रासून टाकलं होतं. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत झाली होती. इतका पैसा की अक्षरशः कचऱ्यात पैशाची पोतीच्या पोती सापडत होती. एवढा पैसा लागतो कशाला हा तसा फार मोठा प्रश्न आहे (इतरही मोठे प्रश्न आहेत म्हणा). पण हल्ली पैसा हे मिरवण्याचं साधन झालं आहे. साखरेला जशा मुंग्या लागतात तसंच जवळ असलेल्या पैशावरून आजुबाजुला किती लोक चिकटतील हे ठरतं. महागड्या गाड्यांमधून फिरणं, मोठाल्या उपहारगृहांमध्ये जेवायला गेलो होतो हे १०० ठिकाणी फोटो 'सोडून' कळवणं, वाढदिवसाला ७०-८० टाळकी गोळा करून रस्त्यावर तमाशे करणं, एखाद्या स्त्रीलाही लाजवेल एवढं सोनं अंगावर घालणं हे बाजारीकरणाचे परिणाम नाहीत तर काय आहेत?
राजकारण म्हटलं की आज प्रत्येकाच्या कपाळावर आठ्या येतात. कारण राजकारणी लोक ते काम करत आहेत म्हणजे आपल्यावर उपकारच करत आहेत अशा आविर्भावात वावरत असतात. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ह्यांच्या गल्लोगल्ली लागलेल्या 'अमुक अमुक साहेबांच्या प्रयत्नातुन तमुक तमुक' कामाच्या
ग्रॅनाईटच्या पाट्या म्हणजे नाकापेक्षा मोती जड म्हणायला लागेल. कर्तव्यांचा विसर पडलेले हे राजकारणी जनतेच्याच पैशातून भलंमोठं साम्राज्य उभं करतात आणि निवडणुका आल्या की त्यातलाच थोडा पैसा लोकांच्या अंगावर फेकतात. आपल्यातल्या काहींची गत खरंच एखाद्या पाळीव कुत्र्यासारखी झाली आहे. जसं आपला मालक (राजकारणी) सांगेल तसं करत जायचं, डोकं वापरायचंच नाही, उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. ह्याच वृत्तीमुळे बाजारीकरणाचे सामाजिक परिणाम किती विस्तृत आहेत हे दिसतं.
अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आज अस्तित्वात आहेत आणि त्यांचं कार्यही मोठं होत आहे. अनेक लोक आज स्वतःहून सामाजिक कार्यासाठी मदत करताना, पुढे येताना दिसतात. अशा सर्व संस्थांचं आणि लोकांचं काम नक्कीच प्रशंसनीयच आहे पण हेतूबाबत नक्कीच काही शंका येतात. अगदी मोजक्याच संस्था खरंच चांगला भाव आणि हेतू ठेवून काम करतात. अनेक संस्था ह्या कर भरावा लागत नाही म्हणून काढण्यात येतात आणि मग १०-१२ वर्षांनंतर कामाचा जेव्हा आढावा घेण्यात येतो तेव्हा लक्षात येतं की फार मोठा घोटाळा घडला आहे. मराठीत एक म्हण आहे, केलेली मदत ह्या कानाची त्या कानाला कळता कामा नये पण इथे तर नुसती जाहिरातबाजीच. गरीबाला १०० वेळा त्याच्या गरीबीची जाणीव करून देवून मग त्याला १०० रुपयांची मदत करण्यात काय अर्थ आहे. त्या व्यक्तीला आर्थिक मदत तर मिळते पण त्याच्या मानसिकतेचं काय? त्याच्या मनात पैशाबद्दल निर्माण होणाऱ्या तिरस्काराचं काय? आपले मदत स्विकारतानाचे फोटो काढताना त्यांच्या मनात नेमका काय विचार चालू असेल? गरिबी स्वाभिमान विसरायला लावते हेच खरं.
सोशल मिडियाचाही आपल्या आयुष्यावरचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि वाढत्या प्रभावासोबत वाढतेय ती ह्यावर पडणारी आपली वैयक्तिक माहिती. आपला आनंद, दुःख सारं काही व्यक्त होतं ते इथेच, आणि ह्यातूनच माणसांमधला दुरावा वाढला आहे. एवढंच नाही तर सोशल मिडिया वर आपल्याला सोयिस्करपणे माहिती दाखवली जाते आणि आपली मतं तयार केली जातात. म्हणजे आधी माणसं विकली जायची पण आता बुद्धी विकली जाते, नव्हे नव्हे शिताफीने विकतच घेतली जाते.
खरं सांगायचं तर दोष माणसाचा नाही, तर माणसाने बनवलेल्या प्रणालीचा आहे. ते म्हणतात ना, 'ओरडेल त्याचा माल खपेल' आता पोटासाठी घसा बसेपर्यंत ओरडायला लोक तयार आहेत, मानसिकताच तयार झाली आहे तशी. आजच्या सेल्समन्सवर एक विनोद फार प्रसिद्ध आहे. एकदा एका सेल्समनला प्रचंड ताप येतो, तेव्हा त्याची बायको त्याला डॉक्टरकडे जायचा हट्ट धरते. तर तो म्हणतो अगं ह्या तापाचं फक्त एकच औषध आहे, मालाचा जास्तीत जास्त खप. इंग्रजीमध्ये ह्याला एक सुंदर शब्द आहे, 'Institutionalization' म्हणजेच वर्तनाची समाजमान्य काळानुरूप पडलेली सवय, प्रथा अथवा परंपरा. अशा बौद्धिक गुलामगिरीची कैद मोडणं आणि ह्या बाजारीकरणाच्या मृगजळामागे न धावणं हीच आजच्या काळातील घडवण्याची नितांत गरज असलेली क्रांती म्हणावी लागेल.
Comments