त्या संध्याकाळी ती पुन्हा आमच्या नेहमीच्या भेटायच्या ठिकाणी आली
मी सुद्धा पोहोचलो होतो, नेहमीप्रमाणे तिच्या आधीच
पण खरंतर आज थोडा उशीरच झाला होता
ती आली आणि बसली
खूप सुंदर दिसत होती ती आज, नेहमीप्रमाणेच
मी तिच्याकडे आकाशात स्वैर विहार करणाऱ्या पक्ष्यासारखा
कुठलीही भीती न बाळगता बघत होतो
अभय फार थोड्याच काळासाठी टिकलं
कारण मी फार आत शिरलो होतो आणि वेळ भरतीची झाली होती
तरीदेखील बुडणार नाही ह्याची दक्षता घेत बघत राहिलो
कारण आजचं स्वातंत्र्य उद्या नशिबात नव्हतं
तिने विचारलं "काय घेणार?"
"नेहमीप्रमाणे तुझ्या आवडीचा चहा"
चहा आवडणाऱ्या काही निवडक मुलींपैकी ती
ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली
"तुला जे हवं आहे ते कधीतरी मागितलं आहेस का रे तू"
तिच्या डोळ्यात नेहमीच मी स्वतःचं एक स्वच्छ प्रतिबिंब पाहिलं होतं
पण आज नाही, आज ते डबडबलं होतं, डगमगलं होतं
तिच्या हातांवर माझ्या अपयशाचं मनोहर चित्र रेखाटलं होतं
आणि ते अतिशय छान रंगलंही होतं
बघता बघता चहा संपला...तिचा, माझा मात्र तसाच निवला
सूर्य मावळतीला आला होता
ती म्हणाली "जाते मी, खूप उशीर झाला आहे"
मीही आज 'येते' म्हणायचा आग्रह नाही धरला
ती उठली आणि निघाली, निघताना स्वतःच्या चहाचे पैसेही ठेवले
स्वतःचं काम चोख बजावायची तिची नेहमीचीच सवय
कदाचित मीच कुठेतरी कमी पडलो माझ्या कामात
टेबलावर ठेवलेल्या नोटांवरचा ओलावा लक्षात येण्याइतका नक्कीच होता
तिची आकृती हळूहळू छोटी होत दिसेनाशी झाली
आता सगळीकडे अंधार पसरला होता
खरंच खूप उशीर झाला होता
-हर्षवर्धन
Comentários