पुण्यातला ब्रेमेन चौक तसा कायम रहदारीचाच. तिथला आषाढी कार्तिकीला चालू होणारा कारंजाही अतिशय सुंदर. गाड्यांची सतत ये-जा जरी चालू असली तरी आसपास कुठेही रस्त्याच्या कडेला गाड्या थांबत नाहीत, चौकातल्या सिग्नलला थांबल्या तेवढ्याच काय त्या थांबतात. विद्यापीठ रस्त्याने कायम येणं जाणं होत असल्याने हा माझा नेहमीचाच अनुभव असतो.
पण त्या दिवशी मात्र फारच वेगळा अनुभव आला. संध्याकाळची वेळ होती, साधारण ४:३०-५ च्या सुमारास, ऊन हळूहळू उतरायला सुरुवात झाली होती. मी सिग्नलला येऊन थांबलो. दुचाकी वर असल्यामुळे चौकात पैसे मागायला थांबलेली लहान मुलं आणि बायका लगेच जवळ आली आणि मी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. खरंतर ह्यात काही नवल नव्हतं, हा सुद्धा रोजच घडणारा प्रकार होता. फक्त आज फरक एवढाच होता की त्यात एका जवळजवळ सहा फूट उंची असलेल्या आजोबांचा देखील समावेश होता.
बाकीच्यांना जसं लक्षात आलं की इथे आपल्याला काही मिळणार नाही, तसे ते पुढे सरकले. आता ते आजोबा हळूहळू जवळ आले, चालायला कदाचित त्रास होत असावा त्यांना. नेहमीप्रमाणे मी त्यांच्याकडेही दुर्लक्षच करणार होतो, पण त्यांनी जवळ येऊन त्यांच्या हातातला पेन विकत घेण्याची विनंती केली. हे त्या चौकासाठीच मुळात नवीन होतं. मग मी पण जरा वर बघितलं, पांढरा, पण बऱ्यापैकी मळकटलेला सदरा आणि पायजमा, डोक्यावर गुंडाळलेलं एक अपुरं पडणारं फडकं, चेहऱ्यावर जुन्या काळातल्या धाटणीचा चौकोनी चष्मा, घासून गुळगुळीत झालेली आणि वजनाने दबली गेलेली पायात न मावणारी चप्पल, एका हातात काठी आणि एका हातात पेनचा बंडल होता. मी पुन्हा वर बघितलं, चेहऱ्यावर थकवा जाणवत होता, पण डोळ्यांमध्ये एक चमक आणि विनम्रता होती.
तेवढ्यात सिग्नल सुटला. मला खरंतर त्यांच्याकडून तेव्हाच दोन पेन घ्यावे असा विचार आलेला मनात, पण पुणं आपलं स्वच्छंद रमणारं, आपल्याच एका संथ पण सावध गतीत चालणारं, टुमदार असं रूप कधीच हरवून बसलंय. आता गाडी पुढे घ्यायला अगदी २ सेकंद जरी उशीर झाला तरी मागचे कावळे लगेच शाळा भरवतात, त्यामुळे तिथून निघालो आणि घरी आलो. घरी आल्यावर मात्र त्या गोष्टीचा विसर पडला होता. दोन दिवसांनी पुन्हा तेच ठिकाण, आणि ते आजोबा पुन्हा दिसले. आज मात्र मी त्यांच्याकडून पेन विकत घ्यायचंच ठरवलं होतं. ठरवल्याप्रमाणे दोन पेन घेतले, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं, बघितल्यावर मला माझ्या आजोबांचीच आठवण आली. माझ्या आजोबांनीही आयुष्यात समाधानाला खूप महत्त्व दिलं होतं आणि तशीच शिकवण आम्हालाही दिली होती. त्यांचा चेहरा बघून मलाही उगाचंच काहीतरी मोठं चांगलं काम केल्याचा एक भाव मनामध्ये आला.
आता त्यांची आणि माझी भेट बऱ्यापैकी नित्याचीच झाली होती, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडून पेन विकत घ्यायचो. त्यांनी माझ्याकडून कधीच जास्त पैशाची मागणी केली नाही, आमचा दर ठरलेला होता, २० रुपयांना २ पेन. नवीन लोकांकडे मात्र ते बरेचदा जास्त पैसे मागायचे, पेनची किंमत हीच त्यांच्या जगण्याची किंमत होती, आणि मी कदाचित त्यांचं जगणं स्वस्त करत होतो. तसंही चौकात ते एकटेच असे होते की जे स्वाभिमान, आणि इमानदारीने पैसे कमवत होते. त्यांचा उदरनिर्वाह फक्त ह्याच गोष्टीवर होता. अंदाजे वयाची ८० गाठली असताना देखील अत्यंत जिगिरीने ते व्यवसाय करत होते. नंतर नंतर माझंही त्या भागात येणं जाणं कमी झालं, अधुनमधून दिसायचे ते आजोबा, कधीकधी नसायचे.
मागच्या महिन्यात जेव्हा भारतात संचारबंदी लागू झाली, तेव्हापासून मनात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. कुठे असतील ते आता?, काय करत असतील?, खायला मिळत असेल की नाही? असे अनेक प्रश्न डोक्यात कायम येत असतात. लोक सध्या जेवण आणि अन्नधान्य देताना अक्षरशः समोरच्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होईपर्यंत फोटो काढतात, भीक मागणाऱ्या बाकी लोकांचं बरं आहे, त्यांना नाही फरक पडत. पण त्या वयाची ऐंशी गाठली असतानाही स्वाभिमान जपणाऱ्या आजोबांवर आज काय परिस्थिती ओढवली असेल? ते अशी मदत स्विकारत असतील की नाही? कदाचित स्विकारतच असतील. कारण मी तरी इतिहासात कुठेही गरीबी आणि भुकेपुढे नितीमुल्यं टिकल्याचं वाचलेलं नाही.
Comments