top of page

1. उपवास

Updated: Jun 11, 2020

आज सकाळी सकाळीच खो-खो रंगात आला होता. पवारच्या भावड्या ने बाळूला मुद्दाम धक्का दिला. तो खांबाजवळच दाणकन आपटला. आणि बाळूचा पाय मुडपला. सगळी पोरं भराभर बाळ्याजवळ आली. शिरप्या पण आला. पण तणतणचं.

“भावड्या, दम जरा, तुला दावतोच, लय डांबरल्यावणी करतुयेस…” पण ह्याला जरा भयंकर लागलय असा काही अंदाज शिरप्याला आला. आणि आपली स्वारी बाळूकडे वळवली. पण भावड्याने आवाज चढवला.


दिन्या: “शिरप्या, बग काय बोलला त्यो तुला. म्या हे नसतं लगा ऐकून घेतलं”

मग बरीच बाचाबाची झाली. हे कमी की काय म्हणून मारामारीदेखील झाली. बाकी नेहमीप्रमाणे मजा लूटत होते. त्यातले दिन्यासारखे काहीजण भांडण कमी कशी होऊ नये आणि हे सगळं कसं चालु राहावं याचा पुरेपूर प्रयत्नदेखील करत होते. ह्या सगळ्या प्रकारादरम्यान काही पोरांनी बाळूला बाजूला नेऊन पाणी वैगेरे पाजलं होत.

मग नेहमीप्रमाणे असं काही भांडण किंवा मारामारी होऊन गेली किंवा संपत आली की एक-दोन केसाळ टाळकी एक टक्कल घेऊन येतात. आणि तेच झालं.

“मास्तर, बेक्कार भांडण चाल्लीइत बगा..”

मास्तर धोतर सांभाळत निघाले.


भांडण निवळली असली तरी अजून तमाशा बाकी होता. मास्तर आले. मास्तरांनी दोघांचा अवतार पाहिला. ह्यांच्या घरच्यांना बोलावणं धाडायचं की नाही अशा काही द्विधा मनस्थितीत असतानाच.. दिन्याने सरांना ऐकू जाईल अशी खुसपुस केली. “का रं, काय वाटत तुला..बापाला बोलवलं का मास्तर ह्यांच्या..”

द्विधा मन असताना ही खुसपुस निर्णय घेण्यासाठी पुरेशी होती.

मास्तर ने दिन्यालाच गावात दोघांच्या घरी पाठवलं.


शाळेत बरीच मिटवामिटवी झाल्यावर शिरप्या आणि त्याचा बाप घरी परतले. शिरप्याचा हिरमोड झाला होता. आणि संतापही. भावड्यावरचा राग. मग मास्तरचा राग. त्यामुळे घरातही चिडचिड चालू होतीच. बाप आधीच ह्या सगळ्याला वैतागला होता. त्याने ही बडबड चालू केली. शिरप्या कमी जास्त बोलला. आणि मग काय त्याने बापाचाही मार खाल्ला. शिरप्या पाय आपटत जे निघाला ते तडक बाळूच्या घरीच पोहचला.


तिथे वेगळाच प्रकार. तसा हा गावात सहसा चालतो. विंचू-काटा चावला किंवा हात-पाय मुरगळाला की शेजारच्या गावातल्या एका बाबाला बोलवायचे. बाबा म्हणजे काय अगदीच भगवे कपडे किंवा कपाळावर भला मोठा गंध तस नाही. पण बऱ्यापैकी वयस्कर. सगळे त्याला बाबा च म्हणत. बऱ्यापैकी भोंदूगिरी.

बाबाने बाळ्या ला नाव विचारलं. हळूच पाय हातात घेऊन कसलतरी तेल लावून मालिश चालू झाली. बाळु थोडा घाबरत घाबरतच विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत होता.

“काय रं..साळेत जातूस ना..??”

“हा..तिकडंच तर पडलो म्या..”

“कोणच्या इत्येला हाईस?”

“सहावी.”

वगैरे, वगैरे..

मालिश आणि प्रश्नोत्तरांत गुंतवून बाबाने कटकन बाळ्याचा पाय मोडला. बाळू लागलीच किंचाळला. कटकट आवाजही आला. त्या बाबाने तो मुरगळा त्या आवजासोबत दूर केला. बाळ्याला चालायला सुद्धा लावले. थोडीशी लचक होती. रग लागत होती. पण ते तसच रेटत बाळूने चालूनही दाखवले. शिरप्या हे आपलं बघत होता. दुपारचं ऊन तस आता चटकत नव्हतं. पण शिरप्या ला तहान लागली होती. त्याने बाळूच्या आईला पाणी मागितलं.

बाबाचं बोलणं चालूच होत.

“आजुक एक बार मालिश करावी लागल. दुखणं कसं अस्स कुठच्या कुठं जाईल. पोरग झ्याक हाई डोसक्यानं. म्या सांगतो तसं करा..समदं कसं नीट व्हईल. बाळू पुढले दोन गुरवार उपास धर. मग कसं समदं नीट व्हईल.”



शिरप्याचा मनात जप चालूच होता. “दोन गुरवार उपास, अन, मग सगळं नीट व्हतयं.”




बाबा प्रकरण झालं. आणि पोर हिंडायला घराबाहेर पडली. बाळू हळू-हळू चालत होता. पायामधली रग आता बऱ्यापैकी नाहीशी झाली होती. शिरप्या मात्र विचारात गुंग होता.


शिरप्याची विचारशृंखला तोडत बाळूने विचारले.

“ऐ शिरप्या, काय चालूये मगापासनं, असा कमुन गप गप??”

“का रं बाळू, ते बाबा म्हणलं तसं, उपासा नं समदं नीट व्हतयं व्हयं??”

“हा. होत असणं. मला काय ठावं..”

“मग म्या बी तुझ्यासंगट उपास धरत असतुया..”

“आरं तुला कुठं काय सांगितलया.. माझा पाय मुडपला म्हणून झालं समदं हे.”

“हा, म्हंजी माझा बी पाय मुडपाया पाहिजी. मग बाबा मलाबी उपास सांगणार. मग समदं सगळं नीट होतं असतया.”

बाळू: “येड्या, अस कुटं अस्तय व्हयं.”


“हे असंच ऐ.. समदं समजून राहिल्यो म्या! मसोबाच्या टेकाडावर येतूस का? पाय राहिला नव्ह ना आता?”


“हा. रग कमी हाय. पर टिकडं जावून काय करायचय तुला आता? मावळतीच्या आत घरला फिरावं लागलं. टायम कमी हाय.”


“लय वटवट नगं करुस आता. चाल आता.”

शिरप्या च्या डोक्यात नक्की काय चालु आहे, ते बाळूला काही लक्षात येत नव्हतं. पण त्याला हे नक्की कळलं होतं की शिरप्या च्या डोक्यातून ‘बाबा आणि उपवास’ काही गेललं नाही.


मसोबा चा टेकाड म्हणजे काय गड वैगरे नव्हे. ओबढधोबढ

चढ-रस्ता. काट्या-कुटक्याचा रस्ता.

टेकाडाकडे जाणाऱ्या रस्त्याला पोरं लागली. आणि शिरप्या ने भलतच सुरु केलं. उडया मारत चाल. मध्येच पळत सूट. खाली खाच-खळग्यांचा अंदाज न घेता बेधुंद चाल. बाळू मात्र जपून पावलं टाकीत होता.


“शिरप्या, आरं काय करतुयां. नीट चाल की. असं येड्यावणी नगं करुस.”


“आज माझा बी पाय मुडपाया पाहिजी! त्यापरिस म्या काय घरला जात नसतुया!”


“मर टिकडं.” अस म्हणून बाळू तिथेच एका दगडावर बसला. शिरप्याचे इकडे उद्योग चालूच होते. बाळूला ही वाटलं. बाबाने सांगितलंय म्हणजे खोटं नाही.

“म्या ह्याची मदत केली पाहिजे. दोस्त ए माझा. जर पाय मुडपून ह्याच बी समदं नीट होणार असलं तर..बाबा च ऐकलं पाहिजी.”


बाळू लागळीच उठला. शिरप्याजवळ गेला. आणि मग काय काय केल्याने शिरप्याचा पाय मुडपलं, वगैरे वगैरे चर्चा. आणि त्याची प्रात्यक्षिकं चालू झाली. पण एवढ्या अथक प्रयत्नांखेरीज शिरप्या योग्य-रित्या चालू शकत होता!

शिरप्या सगळे उद्योग करून आता दमला होता.

तो शांत झाला. दिवसही मावळतीला आला होता. पोरांनी परतीची वाट धरली. दोघेही शांत नीट जपून चालत होते. सारा आसमंत पाखरांच्या किलबिलाटाने तर शिरप्याच मन विचारांनी गजबजून गेलं होतं. लालबुंद सूर्य वातावरणात आपलं अस्तित्व जाणवून देत होता. बाळू एकटक बघत तसचं चालत होता.

शेवटी वाट कशी सरली आणि गाव कधी आलं हे दोघांनाही उमगलं नाही!

“उद्याच्याला भेटू” अस म्हणत दोघांनीही निरोप घेतला.

5 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page