बाळ्या: "शिरप्या, चल कि लका भराभर. कवाधरणं बगतुये.. कशी पाऊलं टाकतुया. उशीर व्हईल रं शाळेला.. बाई वरडतील. अन वरून पुना त्यो हेड सर टपकला तर काय खरं नाय बग आपलं."
शिरप्या: "हा येऊदे त्या मास्तुुरड्याला. घाबरतोय व्हयं म्या. त्याच्या पायी बापाचं टपकं खाल्लं काल म्यां. घर ला सांगायची काय गरज व्हती. बाळ्या, तुला तर ठाव हाय की माझी काल काय बी चूक नवती. म्या गप बसलो होतो.
ते सगळं त्या भावड्यामूळे झालं बग. त्याच्या तर... त्याला तर म्या सोडणार नाय बग. लय सहन केल आता. इतक्या दिस गप हुतो, पर आता नाय, दावतो च संमद्याना..."
कालचं शाळा आणि उपवास ह्याच्या काही डोक्यातून गेलेलं नाहीये अस बाळूच्या एकंदरीत लक्षात आलं.
बाळ्या: "आरं, असं डोसक्यात राग घालू नगं. माझा बा म्हणतो असं डोसक्यात घुसून काय कुणाचं भलं नसतयं होत. जरा दमानं घे. "
शिरप्या: "तू बी शहाना आणि तुझा बाप बी.."
बाळ्या: " शिरप्या, मला बोलतोय तोवर ठीक हाय. माझ्या बापला काय बोलायचं नाय. नायतर बग, एका बुक्कीत पॅक करील.
वड्याचं तेल वांग्यावर कमुन काढतुया तू.. "
शिरप्या: "हा..चुकलं जरा. सोड ना.
वैताग आलाय हिथं..
आर मग काय तर काय शिकून बी उपयोग नाय. रोज त्या तसल्या शाळेत जायचं, अन..."
बाळ्या: "अन काय.. बोंबल की पुढं." (टपली मारत)
शिरप्या:"काय नाय. मरू दे ते..चल खालच्या वढ्याकडं जावू. लय दिस झालं गेलो नाय बग तिकडं.."
बाळ्या: "आणि साळा??"
शिरप्या: "टिकडं रोज जातो आपण..
येतूयेस का बोल.. म्या चाल्लो.."
बाळ्या नाराजीने तयार झाला.
बाळ्या: "बरं..जाता जाता गण्या ला बी संगट घेवू. आणिक एक, तू उपासाच्या नादापायी धडपड करून घेणार नसशील तर म्या येतो!”
शिरप्या: "हा चालतयं...चल बिगी-बिगी.."
बराच वेळ पोर चालत चालत निघाली होती. शिरप्या मात्र त्याचा राग कुत्र्यांवर काढत होता.
बाळ्या: "आरं, शिरप्या, त्या कुत्री ला तरी सोड. बिचारी ती बसलीय. बग किती वाळलीये ती.. "
हे ऐकताच बाळ्याला शिव्यांची लाखोळी वाहत शिरप्या ने त्या कुत्रीला मारून पळवून लावलच.
"आज च काय तुझं मला पटना... जरा गप घे सांगतोय तरी तुझं तेच चाललंय मगापासून.. त्यो बग गणप्या.. टाक शिट्टी"
शिरप्या ने शिट्टी टाकली. गणप्या आणि त्यांची दुरून च नजरा-नजर झाली. गण्याने सगळी गुरं रानमळ्याच्या दिशेला हाकले.
आणि ते एकमेकांच्या दिशेने चालू लागले.
गण्या: "काय मग हिकडं कुणीकड आज.."
शिरप्या: " ह्या बाळ्यामुळं. कटाळा येतूय म्हणला शाळेत. मग म्या म्हणलं चल जरा आपल्या गण्याचं काळं त्वांड बगू."
शिरप्या च हे बोलणं ऐकून बाळू मोठयाने हसू लागला.
गण्या: "शिरप्या, उग काही बोलू नग. अन तू रे बाळ्या, तू बी ह्याचा नादाला लागून हास्तुस व्हयं."
बाळू: (शिरप्या ला गुपचूप डोळा मारून, गण्याची उगाचच खेचायची म्हणून, बोलू लागला)
"तुला काय कळत नाय. आम्ही शाळेत जातो. जाऊ दे रे. तू ला नाय कळायचं."
गण्या: नाय धाडत माझा बा शाळेत मला.
मला बी कवा-कवा वाटतं की तुमच्या वणी साळेत जावं. धमाल करावी.
तस आज शाळेबद्दल राग आलेल्या शिरप्या ने मात्र अचानक गण्याची बाजू घेतली. साहजिक होत ते.
शिरप्या: "बरंय तू नाय त्या शाळेत. काय धमाल नसतिया.
हे बग, मला बा न कुटला काल, ह्या शाळेपायी. "
(शिरप्या ने शर्ट काढून पाठीवर चे व्रण दाखवले)
अचानक पाठिंबा काढून घेतल्यामुले बाळ्या चा चांगलंच पचका झाला होता. त्याच्या तोंडावरून हे दोघांना पण कळलं. आणि मोठ-मोठयानं हसू लागले. गण्या तर जमिनी वर लोळयाचाच बाकी राहिला होता.
तेवढ्यात त्यांना एक बर्फाचा गोळेवाला दिसला.
शिरप्या: "ऐ बाळ्या, पैकं हायत कारं?"
बाळ्या ने लगेच सगळे खिसे चाचपून पाहिले.
शिरप्या ने पण सगळं दप्तर पाहिलं, पण त्याला पण काही मिळालं नाही.
गण्याला कसेबसे काही पैसे मिळाले. पोर एकदम खुश झाली. मुलं पळत-पळतच त्या गोळ्यावाल्याजवळ पोहचली.
शिरप्या: (धापा टाकत) "का रं, केवढ्याला एक?"
"धर हे पैकं”
गोळेवाल्याने पैसे घेऊन दोन गोळे पुढ्यात केले.
गण्या: दोन च व्हयं रं?
बाळ्या: लयं पैस दिल नव त्वा!
तिघांत ते दोन गोळे त्यांनी आनंदात खाल्ले. शिरप्या ने तर बाळ्याच्या शर्टाला तोंडपण पुसलं.
त्यांच्याकडे पाहून तो गोळेवाला स्मित हास्य करून पाहत राहिला. कदाचित त्याला त्याचं बालपण आठवलं असावं.
ही अशी टिंगल करत करत पोर दिवसभर बोंबलत फिरली. ओढ्यावर सगळयांनी डुबक्या घेतल्या. पुढं तलावावर पाण्यावर 'भाकऱ्यां' चे तरंग उठवत कोणाचे किती टप्पे ह्यावरुन हमरी-तुमरी पर्यन्त वाद ही झाले.
भूक लागली की जे दिसलं ते फळं वैगरे खाल्ली. गावातल्या बाकी पोरांसोबत विटी-दांडू, सूर-पारंब्या खेळली. डोक्यावरचा सूर्य मावळती ला येईपर्यंत पोरं हुंदडत होती. कोणालाच भान नव्हतं. शाळा सुटून गेली होती.
घरी जायची वेळ झाली होती .
शिरप्या: "लका, घर ला जाया हवं. आमचा बाप यायचा टायम झाला आता."
बाळ्या: "हा.. हा.. जाया तर हवं. नायतर तू ला परत उगा मार पडायाचा. आणि उद्या परत रडत रडत बा नं कस झोडपलं, ऐकावं लागणार."
हे ऐकल्यावर बाळू एक कानफटात खाता खाता गण्यामुळे वाचला.
गण्या: " ऐ शिरप्या, मस्करी करतयं ते, कळत नाय व्हयं. उग रगात गरम नगं करुस."
ह्या दिवसभरच्या आगळ्या-वेगळया भ्रमंतीमुळे खरंतर शिरप्याचा पारा सूर्याप्रमाणे उतरला होता. कालची भांडनं, बाबा आणि उपवास हा सगळा विषय कुठच्या-कुठे निघून गेला होता. पोरं घराच्या दिशेने निघाली होते. प्रचंड पायपीट झाल्यामुळे पाय फणफणत होते. जाता-जाता गण्या त्याच्या गुरांपैकी एकावर बसून ऐटीत चालला होता. अधून-मधून शिरप्या आणि बाळ्या पण बसले.
एकंदरीत सगळेच आप-आपल्या तंदरीत होते.
शिरप्या त्याच दुनियेत घरी आला.
घरी आल्यावर बापाला कळलं की शिरप्या चा रंग आज काही और च आहे. पोरगं खुश पाहुन त्या बापाला समाधान वाटलं. "बापाला आणखी काय हवं असतं" असं स्वतः शी पूटपुटत त्याने शिरप्या ला जवळ घेतलं, माये नं!
Comments